

कोकणातील महाड, पोलादपूर,खेड व मंडणगड तालुक्यांच्या ग्रामीण भागांमध्ये पारध म्हणजेच शिकारीची सुरूवात झाली असताना रेडयांच्या झोंब्यांचेही आकर्षण वाढत आहे. मात्र, या दोन्ही अमानुष परंपरांच्या शौकिनांचे कायद्याच्या विरोधात वर्तन होत असल्याने ते या कायद्याविरोधात संस्कृती रक्षणाचे हत्यार उपसून या परंपरांतील अमानुषतेला प्रोत्साहन देऊ पाहात आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करणा-यांना या शौकिनांकडून चिथावणी दिलेल्या लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे तर या अनिष्ट प्रथांबाबत जनतेचे प्रबोधन करण्याच्या प्रयत्नांनाही हाच अनुभव घ्यावा लागत असल्याने कायद्याची व्यापक अंमलबजावणी करण्याची आवश्यकता निर्माण होण्यासोबतच विविध आध्यात्मिक सांप्रदायांतील प्रमुखांनी या अमानुष परंपरांविरोधात ग्रामीण जनतेचे प्रबोधन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.वन्यजीव संरक्षण कायद्याचे अज्ञान अथवा जुन्या अमानुष परंपरांचा पगडा ग्रामीण भागावर अद्याप कायम असल्याने शिकारीचा हा शौक आजही जोपासला गेला आहे. सध्या पौष पौर्णिमेपासून देव पारधीला गेलेत...या जुन्या रूढ परंपरेतून शिकार म्हणजेच पारध करण्याची परंपरा तत्कालीन दंडकारण्यात म्हणजे सध्याच्या महाड, पोलादपूर, महाबळेश्वर, जावळी, खेड, मंडणगड, दापोली अशा तालुक्यामध्ये पाहण्यास मिळते. या तालुक्यांच्या ग्रामीण भागांमध्ये सध्या रानडुक्करं, मोर, लांडोरी, रानकोंबडे, ससे, रानमांजर, साळींदर, भेकर अशा वन्यजीवांची सर्रास पारध करण्याचा प्रकार गावकी स्वरूपात सुरू झाला आहे. संतांच्या वचनांचा प्रभाव हरिनाम सप्ताहांच्या सांगतेनंतर अल्पावधीत संपून पौषाच्या पौर्णिमेनंतर संत माहात्म्यांनी सांगितलेली प्राणिमात्रांबाबतची भूतदया मात्र परंपरांच्या अमानुषतेमध्ये कोठे गायब होते हे या वारकरीबहुल तालुक्यामध्ये समजूनही येत नाही. याबाबत कायदा काय म्हणतो? याकडे दूर्लक्ष करीत परंपराच अव्याहत ठेऊन त्या परंपरांना 'हिंदू' परंपरा सांगण्याचा प्रकारही ज्यांना हा धर्म समजला नाही अशा शौकीनांकडून मोठया आवेशात होत आहे. या परंपरा वन्यजीवांची हानी घडविण्यासोबतच पर्यावरणाचा समतोल बिघडवित असल्याने कायद्याने घातलेली बंधने प्रभावीरित्या राबविण्यासोबतच सर्व हरिभक्त परायकांनी याबाबत प्रबोधन करण्याची गरज आहे. चिकन आणि बोकडाचे मटन महाग झाल्याने फुकटच्या पारधीचा पर्याय स्विकारणा-यांना कायद्यात अडकल्यावर हा पर्यायच अधिक महाग असल्याचे सलमानखान व अन्य बहुचर्चित प्रकरणांमुळे जाणवू शकेल. तीन वर्षांपूर्वी महाडच्या एस.टी.स्थानकामध्ये वाघाचे कातडे घेऊन जाणा-या तिघांना पकडले. ते पोलादपूर तालुक्यातील शिकारीतून मारलेल्या वाघाचे होते असे निदर्शनास आले होते. मात्र, याबाबत वनविभाग फारसे गांभिर्याने पाहात नाही. याशिवाय देवदिवाळीपर्यंत रेडा, कोंबडा आणि मेंढा अथवा बोकड आदी पाळीव प्राण्यांच्या झोंब्या लावण्याचीही पध्दत पाहण्यास मिळते. याला परंपरा जरी म्हटले जात असले. तरी यामध्ये झोंब्यांच्या शौकीनांची संख्या लक्षात घेता या झोंब्या देवदिवाळीनंतर शिमग्यापर्यंतही सुरू ठेवण्याचा धंदेवाईकपणा या परंपरेत आला आहे. कायदा काय म्हणतो? याकडे या झोंबी शौकिनांचे फारसे लक्ष नसते कारण अनेक राजकारणी या झोंब्यांद्वारे मोठया जनसमुदायांना सामोरे जाण्याची संधी मिळविण्यासाठी प्रयत्न करताना कायद्याच्या रक्षणकर्त्यांवर दबावतंत्राचा वापर करतात. महाड आणि पोलादपूर तालुक्यांतील सर्वच रेडे देवदिवाळीपर्यंत समोरासमोर आल्यावर नैसर्गिकरित्या टक्करा मारू शकत असल्याने पाठ सोडण्याची माहिती रेडयांचे मालक असलेल्या शेतक-यांना चांगलीच ज्ञात असते. मात्र, धंदेवाईक झोंब्यांमध्ये अशा पाठ सोडविण्याची क्षमता असणा-या शेतक-यांना आणि झोंबीत कोण जिंकला?... अन् कोण हरला? ठरविणा-या पंचांनाही आयोजकांकडून चांगले मानधन दिले जात असल्याने स्वत:चे रेडे गोठयात बांधून जे शेतकरी दुस-यांच्या रेडयांची पाठ सोडवायला सरसावतात... त्यांना दुस-यांचे रेडे काबूत आणता आले नाहीत तर रेडे रक्तबंबाळ होतात अथवा ठारही होतात. संत ज्ञानेश्वरांनी रेडयांच्या तोंडून वेदपठण केल्याचे माहित असूनही या वारकरीबहुल आध्यात्मिक क्षेत्रात रेडयांच्या झोंब्यांचे आकर्षण वाढीस लागणे ही बाब अनाकलनीय आहे. गेल्या पंधरवडयात अशाच पोलादपूर तालुक्यात ज्या गावाच्या मुंबई रहिवाशांनी हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते. त्यांच्या गावातील राजकारण्यांनी मात्र, झोंब्यांचे आयोजन केले होते. कोकणात अशा कामी ग्रामदेवतेचा कौल घेण्याची प्रथा आहे आणि तसा कौल मिळाला नसतानाही झोंब्या लावून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. योगा योगाने या गावातील म्हैसकडयावरून कोसळून दोन झुंजार रेडयांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला नांव आणि पैसा मिळवून देणा-या रेडयांच्या मालकांचा हव्यास वाढल्याने रेडयांची आत्महत्या असे बातमीमध्ये नमूद झाल्यानंतर याच राजकारण्यांनी रेडयांच्या पाठिवर बसून झोंब्यांचे राजकारण करताना हिंदू परंपरा या शब्दाचा उच्चार केला. रेडयांच्या पाठिवर बसणा-याला यम म्हणतात, हे तालुक्यातील वारकरी बहुल संप्रदायाला चांगलेच माहिती असल्याने या यमांच्या नादी कोणी लागले नाही. परंतू, झोंब्यांचा धंदा सुरूच राहिल अशी दर्पोक्ती करणा-यांना या निमित्ताने कायद्याचा धाक त्यावेळी जाहिर केलेल्या महाबळेश्वर मार्गावरील झोंब्या पोलीस इन्स्पेक्टर विजय कदम आणि सहकारी पोलीसांनी हस्तक्षेप करून बंद केल्याने बसला. प्रत्येकवेळी कायद्याचे रक्षक कर्तव्य कठोर असतील, अशी शक्यता नसल्याने आता आध्यात्मिक मार्गांनीच प्राणिमात्रांबाबतच्या भूतदयेबाबत तालुक्यातील जनतेचे प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शैलेश पालकर
पोलादपूर
No comments:
Post a Comment